मायबोली

ज्यांची मातृभाषा ("मदरटंग") मराठी आहे अशी मुलं जेव्हा "गॅदरींगसाठी डान्स बसवायचाय", "डिबेट कॉंपिटिशन साठी नाव रजिस्टर करायचंय", असं सांगतात तेव्हा मन खूप उदास होतं. स्नेहसंमेलनासाठी न्रुत्य... ठीक आहे 'नाच' सोपं; वक्त्रुत्व स्पर्धेसाठी नावनोंदणी असे मराठी शब्द वापरायला काय होतं ? बोलता बोलता मित्राला 'मिस' का करायचं आणि संवाद साधण्यासाठी 'चॅटिंग'चाच आधार का घ्यायचा? मराठीचा मायबोली म्हणून उल्लेख करतानाच तिला इंग्रजीचा टेकू लावायचा हे खुपणारं आहे. 

खरं म्हणजे रोजच्या जीवनात बोलताना वापरण्याजोगे कितीतरी मराठी शब्द उपलब्ध आहेत, असतीलही आणि इच्छा असेल तर शोधून वापरतादेखील येतील. पण या जगाच्या वेगवान स्पर्धेत 'शोध अभियांत्रिकी'तून (सर्च इंजिन) जे शब्दजंजाळ उपलब्ध आहे त्यात बिचाय्रा मराठी शब्दांना स्थान कितीसं ?

पाच एक वर्षांपूर्वी पुण्यात भरलेल्या दहाव्या साहित्यिक कलावंत संमेलनात 'मराठी भाषा - स्थिती आणि गती' या विषयावर झालेला परिसंवाद आठवतो. त्यातल्या एक वक्त्या होत्या विद्यावाचस्पती (डॉ.)अश्विनी धोंगडे. त्यांचा जोर इंग्रजी शब्दांचे मराठीवरील अतिक्रमण यावरच होता. साहजिकच स्त्रीसुलभ विचारांतून त्यांनी अगदी सोप्या पण परिणामकारक वाक्यांत अगदी कीचन(स्वैंपाकघरा)पासून आपण कीती इंग्रजी शब्दांची मराठीला फोडणी देतो हे सांगत आपल्याला पर्यायी मराठी शब्द माहित करून घेऊन वापरले पाहिजेत किंवा मराठी शब्द निर्माण केले पाहिजेत हे समजावून सांगितलं. आजची मराठीची 'मिंग्लिश' स्थिती बदलून तिच्या 'मराठी' सोज्वळ पण प्रसंगी ठसक्यात चालण्याला गती आणायची असेल तर जपाननं जसं आयात तंत्रज्ञान वापरात आणण्याआधी त्यातल्या शब्दजंजाळाला जपानी भाषेचं कुंपण घातलं तसं आपणही केलं पाहिजे हे त्यांनी मार्मिकतेनं सुचवलं. 

नंतरचे वक्ते विदर्भवासी डॉ.श्रीपाद जोशी यांनी जोशपूर्ण भाषणात मराठी भाषेला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेऊन ठेवलं. तिची साडी फेडून तिला झग्यात आणण्यात वसाहतवादाचा आणि भांडवलवादाचा हात आहे हे त्यांनी ठामपणे सांगितलं. त्यातच मराठी ही केवळ उच्चवर्णीयांची नाही तर बहुजन समाजाची आहे; पण उच्चवर्णियांनी भांडवलशाहीशी हातमिळवणी करून मराठी आपली मक्तेदारी समजली; शिक्षणसंस्थांनी मराठीला पर्यायी तंत्रज्ञान विषय ठेवून मराठीची गळचेपी करण्याचा कट केला असे मुद्दे प्रभावीपणे मांडले. परिसंवादात मराठीच्या एकंदर पीछेहाटीला कारण ठरल्याचा ठपका राजकारण्यांवरही ठेवला गेला. त्यांच्या सोयीस्कर वागण्यावर आणि इंग्रजी शाळांचं पेव फोडून आपल्या तुंबड्या भरून घेण्याच्या नादात मराठी बाण्याला हरताळ पुसण्याच्या व्रुत्तीवरही हल्ला चढवला गेला. या साय्रात वक्त्यांचा मराठीविषयीचा जिव्हाळा आणि कळवळा दिसला तो निश्चितच आदरणीय होता.

असं म्हणतात की 'प्रेमाचा मार्ग पोटातून जातो' म्हणजे मराठीबद्द्लचं प्रेम निर्माण करणारं 'स्पूनफीडींग'च ('चमच्यानं भरवणं' अगदीच 'किडींग' वाटतं नाही !) कमी पडतंय का? 

विचार करता, सगळ्या परिस्थितीचं मूळ माणसाला वेठीला धरणारी 'भूक' हीच आहे असं वाटतं. मराठी मुलाची माय "गिळ मेल्या.." असं बोलल्याशिवाय त्याची भूक भागत नसायची. पण आता माय बोली, "टू मिनट्स हं...." तभीच भूक 'भागती' है.  गंमतीत केलेला हा शब्दच्छळ सोडून देऊ, पण खरंच, कुठल्याही गावाच्या, प्रांताच्या, राज्याच्या राष्ट्राच्या भरभराटीला आणि ह्रासाला 'भूक'च कारण असते. ब्रिटिशांना वसाहतवादाची भूक लागली आणि त्यांनी भारताच्या इतर भाषांबरोबरच मराठीलाही साडी फेडून झगा घालण्याची सवय लावली. आपल्याला शिक्षणाची भूक होती हे लक्षात घेऊन इंग्रजीला वाघिणीचं दूध संबोधून तिचं प्राशन करण्याची सक्ती केली गेली आणि मग पुढे त्याची चटकही लागली. आपली बौद्धीक भूक भागवण्यासाठी आंग्ल भाषेतली पुस्तकं आणून वाचावी लागली, परंतु ती पचण्यासाठी मायबोलीत भाषांतरीत करून मग रवंथ करत बसण्याची उसंत कुणालाच नव्हती.

विकसित देशांतलं तंत्रज्ञान आणून आपल्याला सुखसुविधा पुरवणाय्रा जिनसांची 'भूक' भागवण्यासाठी त्या यंत्र-तंत्रांची माहिती देणारी पुस्तिकाही त्यांच्याच भाषेत वाचावी लागते. चंगळवादाची 'भूक' वाढत चाललीय हे परदेशी बनावटीच्या जाहिरातींच्या अतिरेकावरून लक्षात येतं. या जाहिराती मराठीतही बोलून दाखवल्या जातात प्रादेशिक द्रुकश्राव्य वाहिन्यांवरून्, पण मराठी भाषेची.. तिच्या शब्दोच्चारांची विटंबना करतच. या भोगवादी व्रुत्तीच्या व्यावसायिकांची, जाहिरातदारांची पैशाची 'भूक'ही एवढी तीव्र झालेली आहे की त्यांचे आयात केलेले अमराठी दिवस साजरे करून आपण त्यांची धन करत असतो. सेंट व्हॅलेंटाईन युद्धात विधवा झालेल्यांच्या पुनर्वसनासाठी जगला... त्याच्या स्म्रुती आपल्या दिखावू प्रेमाच्या 'भुके'चं प्रदर्शन मांडून आपले मराठी युवक साजरे करत असतात त्यांना कोण रोखणार? तेसुद्धा गुलाब नाही.. 'रेड रोझ' किंवा छानशी भेट नाही.. 'गिफ्ट' देऊन साजरं करतात आणि अनुकूल प्रतिसाद .. नव्हे 'रिस्पॉन्स' हुकणारे.. नव्हे नव्हे 'मिस' करणारे..... किती उदाहरणं द्यायची या इंग्रजी खड्यांची ! आपलं 'ट्रॅडिशन'..('परंपरा' का नाही म्हणायचं?) दाखवण्याची एखाद दिवशी लहर येते आणि मग एक दिवस 'पारंपारिक' पोशाखात मिरवण्यात जातो.. पण ती शेवटी 'फॅंन्सी ड्रेस' स्पर्धाच होऊन बसते. ही आहे आपल्या रुपाच्या आणि पैशाच्या भांडवलाचा अहंकार सुखवण्याची 'भूक'. त्यासाठी मराठीला लागतात इंग्रजीच्या कुबड्या. 

पोटाची भूक ही तर आहेच सनातन, प्रत्येक जीवाला. त्यासाठी परप्रांतात किंवा परदेशात जाऊन राहणं आलं. तिथं बस्तान बसण्यासाठी तिथली भाषा आत्मसात करणं आलं. अशावेळी आपल्यापुढे पर्याय नसतो. पण बड्या पगाराची नोकरी देणारं परदेशी कंपनीचं पिल्लू आपल्या मायभूमीत बस्तान बसवतं तेव्हाही त्यांची जगभर पसरलेली आंग्ल भाषाच बोलायची...चालायची...खायची... प्यायची..खाल्या मिठाला जागण्याचा हा आमचा सोयीस्कर बाणा जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्या मायभूमीत आपल्या मायबोलीच्या प्रगतीला गती नाही.  नाही म्हणायला, परदेशात महाराष्ट्रीय मंडळ स्थापून मराठी कार्यक्रम तिथं करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.. पण पुन्हा हे सारं परदेशात. माझ्या मायभूमीत मायबोलीला संसर्ग इंग्रजीचाच.

भारतात काही दाक्षिणात्य राज्यांमध्ये त्यांच्या भाषेतच बोललात तर प्रतिसाद देतात. पण महाराष्ट्रात आम्ही 'हिंम'त दाखवतो पाहुण्याच्या भाषेत बोलण्याचीच (इथं 'हिंम'त म्हणजे 'हिंदी मराठी'चं कडबोळं करुन हे स्पष्ट व्हावं). आता राजकारण्यांनाच का फटकारायचं? त्यांना असते सत्तेची 'भूक'... त्यासाठी ते सारे आदर्श धाब्यावर बसवू शकतात तर मराठीचा कळवळा घेणाय्रांची आक्रमकता थोपवण्यास कितीसा वेळ लागणार! त्यांची समीकरणं त्यांच्याच भाषिकाच्याच काय, परभाषिकाच्याही डोक्याबाहेरची आहेत. महाराष्ट्राच्या सांस्क्रुतिक आणि आर्थिक केंद्रांमध्ये नवश्या गवश्या परप्रांतियांची प्रचंड आवक झाल्यानं, "मराठी असे आमुची मायबोली...." म्हणताना शेजारचा माणूस पटकन, "..माय बोली तो.. क्या बोली?" असं विचारेल की काय अशी भिती वाटते. 

याला अपवादात्मक आणि आशादायक उदाहरण आठवलं ते म्हणजे फ्रान्सिस दिब्रेटोंसारखे ख्रिस्ती विद्वान, जे संतसाहित्याच्या अभ्यासाची भूक मराठीतून भागवतात आणि त्यांचं बोधाम्रुत मराठीतून इतरांनाही पाजतात. असे थोर आदर्श आपण डोळ्यांपुढे ठेवले तर का नाही मराठीतले इंग्रजीचे खडे बाजूला करण्याची उर्मी आपल्या मनात जागणार? 

आता हा जो लेखनप्रपंच चालला आहे, तो संगणकावर (कॉम्प्युटर) टंकलेखन करत आणि संगणकपटलावर (स्क्रीन) मूषकाच्या (माऊस) सहाय्यानं मूषकध्वज (कर्सर) हलवून शब्दसंकलन करून चालला आहे.. इंग्रजी खड्यांच्या जागी मराठी रत्नभांडारातले शब्द घालून. 

जय मराठी ! जय महाराष्ट्र !

टिप्पण्या

  1. मायबोली मराठी चांगलीच आहे पण कालप्रवाहात ती आंग्यलायली हे खरं आहे. तिला आपण मिंग्लिश म्हणू शकतो.उत्तम लेखन. 👍👍😆

    उत्तर द्याहटवा
  2. खरंय. मराठी माणूसच मराठीचा शत्रू आहे. मराठीचे शब्द भांडार संपन्न आहे. मराठी माणसाने मनापासून ठरवले की मराठीतच लिहायचे आणि बोलायचे तर ते अवघड नाही.

    उत्तर द्याहटवा
  3. काका प्रथम तुम्हाला माझा नमस्कार..!!
    माझं मराठी भाषेविषयी असलेलं माझं मत मी मांडू इच्छितो.माणसाच्या मुलभूत गरजा लक्षात घेतल्या तर अन्न,वस्त्र आणि निवारा आता त्या मध्ये नव्यानं तंत्रज्ञान समाविष्ट झाले आहे.प्रत्येकाला जगण्यासाठी चांगल्या शहरातील महाविदयालयात नाहीतर नौकरी साठी जावं लागतं.या सर्व गोष्टी इंग्रजी मधे उपलब्ध आहेत या सर्व गोष्टी आम्ही मराठी मध्ये शिकलो तर याचा फायदा आम्ही ज्या समाजात राहतो त्यांना होईल आणि त्या माध्यमातून समाजाचा विकास होईल आणि देश विकसनशील कडून विकसित देशांच्या रागेंत जाऊन बसेल परंतु आपल्या शिक्षण पद्धती मधे अगोदर एबीसीडी नंतर अा आ इ ई शिकवल्या जाते म्हणून येणारे शिक्षण धोरण मराठी भाषेला न्याय मिळून देईल अशी मला आशा आहे. शिवाय मराठी माणूस हा सुशिक्षीत बेरोजगार राहणार नाही.जय हिंद,जय महाराष्ट्र..⛳

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. चांगले विचार आहेत .. सचिन.... आता नविन शैक्षणिक धोरणात प्राथमिक शिक्षण मराठीतून संक्रांतीचे आहे.

      हटवा
  4. लेख आवडला. लेखन नेहमी सारखेच सहज आणि मार्मिक आहे. मराठीची भूक कशी वाढवता येईल या बद्दल आणखी वाचायला वा बोलायला आवडेल.

    उत्तर द्याहटवा
  5. नेहमप्रमाणेच सुंदर लेख लिहिला आहे. सर्व मुद्दे आणि विचार फार छान मांडले आहेत. जय मराठी! जय महाराष्ट्र!

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा